लंडनला सकाळी-सकाळी पोचलो; विमान वेळेपेक्षा अर्धा तास आधीच उतरलं. इमिग्रेशनचे सोपस्कार आटपून लवकर बाहेर पडू असं वाटलं. पण अमेरिकेसारखाच याही वेळी वैताग आला. उणेपुरे अडीच तास रांगेत घालवल्यानंतरच आमची सुटका झाली. तिथून चुलतभावाच्या, शेखरच्या घरी गेलो. बऱ्याच दिवसांनी उपमा आणि दुधी हलवा असा स्मिताच्या हातचा ‘देसी’ फराळ करून मग सेंट्रल लंडनमध्ये Air bnb मध्ये पोचलो. इथली जागा बघून मात्र निराशा झाली. फोटोत बघितल्यापेक्षा जागा छोटी होती. पण फक्त दीड दिवसांचा प्रश्न होता. प्रकाशच्या सामान पॅकिंगच्या शैलीनुसार दीड दिवस लागणारे कपडे एका छोट्या बॅगेत ठेवले होते. त्यामुळे बाकीच्या बॅगा परत नेण्यासाठी रचून ठेवल्या. विमानात न मिळालेली झोप काढली आणि संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. तेव्हा लक्षात आलं की ट्युब स्टेशन अगदी जवळ आहे आणि आजुबाजुला खूप रेस्टॉरंटस् आहेत. मग जागा बरी नसल्याचा राग निवळला. इंग्लिश चहा घेतला. लंडन आय बघायला निघालो. हा पाळणा म्हणजे खास माझ्यासारख्यांसाठी आहे. एवढा उंच असूनही इतका संथ गतीने फिरतो की चक्कर वगैरेचं नावच नको.

- लंडन आय
Continue reading “१६. मुंबई व्हाया लंडन” →